पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम*मुलेच बनली एक दिवसासाठी वृद्धांचे पालक…!*

0
7

पुणे दि. २२ पीसीबी – वृद्धाश्रमातील केरकचरा काढण्यापासून फरशी पुसणे, कपडे धुणे, भांडी घासणे, नाश्ता बनविणे ते आजी आजोबां बरोबर खेळणे..असा शालेय वेळातील दिनक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी आज “आनंददायी शनिवार” हा उपक्रम साजरा केला.
अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी आंदर मावळ मधील कुसवली गावात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात हा उपक्रम घेण्यात आला. निमित्त होते पुणे जिल्हा परिषदेने आखलेल्या “आनंददायी शनिवार” या योजनेचे…! प्राथमिक शाळेतील मुलांना स्वावलंबनाची सवय लागावी, उत्तम संस्कार बीजे त्यांच्यावर रुजावी, थोरा-मोठ्यांची व घरातील जेष्ठांची त्यांनी काळजी घ्यावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने आनंददायी शनिवार ही संकल्पना आणली आहे. या उपक्रमाचाच भाग म्हणून आदिवासी गाव अशी ओळख असलेल्या कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमाची याच गावातील शाळेने त्यासाठी निवड केली. मुख्याध्यापक गोकूळ लोंढे, संगीता धनवे यांनी ३५ विद्यार्थ्यांना घेऊन शनिवारी सकाळी आश्रमात श्रमदान करायला सुरुवात केली. काही मुलांनी आजी आजोबांचे पाय चेपणे, केस विंचरणे, लायब्ररीतील पुस्तके क्रमाने लावणे तर मुलींनी स्वयंपाक घराचा ताबा घेऊन कांदा पोहे बनवले व आजी आजोबांना खाऊ घातले. काही मुलांनी आजोबां बरोबर बॅडमिंटन खेळत तर काहींनी क्रिकेट खेळत सर्वांचे मनोरंजन केले. मुलांच्या या प्रेमाने व त्यांच्या कोवळ्या हाताने ते करीत असलेली कामे पाहून उपस्थित सर्वांचे यावेळी डोळे पाणावले.
आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत करत सर्व विद्यार्थ्यांना जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पॉकेट बुक्स भेट दिले.