पुणे : कल्याणी नगर मधील बॉलर पबला ठोकले टाळे ; परवानाही केला रद्द

0
132

दि २६ मे (पीसीबी ) पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात दोन युवकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्याचे सत्र सुरु केले आहे. कल्याणी नगर मधील बॉलर या पबवर दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पाहणी केली असता नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने या विभागाकडून थेट बॉलर या पबला टाळे ठोकण्यात आले असून परमिट रुमचाही परवाना रद्द केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क ‘अ’ विभागाने केली.
बॉलर पबवर गुन्हा दाखल केल्यानंतर नियमांचे पालन जात नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पबवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक रोहित माने, विरेंद्र चौधरी, पोलीस कर्मचारी श्रीधर टाकाळकर, विकास घोलेकर, शिवाजी शिंदे, मासाळकर, पाचारणे याच्या पथकाने शनिवारी रात्री ११ वाजता बॉलर पबवर कारवाई केली.

कौसडीकर म्हणाले की, ”कल्याणीनगर मधील पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. नेहमीप्रमाणे करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच ही कारवाई होती. बॉलर पबवर दोन दिवासांपूर्वी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र पाहणी केली असता पबमध्ये नेहमीप्रमाणे धांगडधिंगाणा सुरूच होता. त्यामुळे विभागाच्या पथकाने पबमध्ये जावून उच्च आवाजात सुरु असलेली गाणे बंद केले. पबला दिलेल्या परवान्यानुसार जेवढा परवाना दिला आहे, त्याच ठिकाणी मद्य विक्री करणे आपेक्षित होते. मात्र पबच्या इतर ठिकाणी देखील मद्यविक्री सुरु असल्याचे दिसून आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहित पब चालकाकडून नोंदी ठेवण्यात अनियमतता दिसून आली. विक्री केलेल्या मद्याच्या एक अन एक बॉलची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोणत्याच नोंदी केल्याचे यामध्ये दिसून आले नाही. ताकीद दिल्यानंतर तसेच गुन्हा दाखल करुन ही नियम पाळण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाना आणि अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलर पबला सील करण्यात आले आहे.”

कारवाई दरम्यान बॉलर पब मध्ये असलेल्या सर्व ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. सर्व ग्राहक बाहेर पडल्यानंतर पबमधील मुद्देमाल सील करुन गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हा पब काही काळासाठील सील करण्यात आला आहे. असेही कौसडीकर यांनी सांगितले.

कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर आता पब आणि बार मालकांचे धाबे चांगलेच दणालले आहेत. कारण पब आणि हॉटेल चालकांवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. कुठे नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येताच थेट परवाना रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. अपघात प्रकरणानंतर शहरासह राज्यात संतापची लाट उसळली आहे. पब मुळे पुण्याच्या संस्कृतीला बोट लागल्याने पुणेकर संतापले आहेत. पबमुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पबला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे. यावरुन राजकारण देखील चांगलेच तापले आहे. असे असताना देखील पब आणि बार मालक सरकारी यंत्रणांना जूमानत नसल्याचे समोर आल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून १४ पथकांमार्फत धडक मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील ४९ हून अधिक पब आणि बार वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ते बंद करून सील करण्यात आले आहेत.