पिंपरी, दि. १९ : देशात पिंपरी चिंचवड शहराची वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख आहे. शहराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता पर्यावरणीय संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. देशी प्रजातींच्या वनस्पतींनी साकारलेले हे घनवन पक्षी, प्राणी व सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित अधिवास ठरेल. आपल्या पुढील पिढीसाठी शहरातील हरित व निरोगी वातावरण निर्माण करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये हरितप्रेमाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष संवर्धन विभाग व वनराई सामाजिक संघटना यांच्या वतीने संत कबीर उद्यान परिसरात ‘देशी वनस्पती, झुडपे व वेली यांचे घनवन’ या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
या कार्यक्रमास महापलिकेचे उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उद्यान अधिक्षक योगेश वाळूंज, सनदी लेखापाल के.एल. बन्सल, वनराई सामाजिक संस्थेचे धनंजय शेंडाळे, संजय कुंभार, संजय खटावकर, संजय अरुळकर, केतुल सोनिग्रा, संजय शहा, राजेश साहु, राजेश कडू, राजेंद्र बाबर, माणिक धर्माधिकारी, नरेंश राव, राजीव भावसार, राजेंद्र भोसले, बन्सल, उदय देवळे यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संत कबीर उद्यान परिसर नागरी संघटना यांचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाच्या उद्देशाने आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने शहरात ‘देशी वनस्पती, झुडपे व वेली यांचे घनवन’हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत उद्यानामध्ये देशी व आयुर्वेदिक झाडांची लागवड केली जाणार आहे. या घनवनामध्ये पांडुडा, करवंद, तरवड, भारंगी, पांढरफळी, मुक्कुटशेंग, अडुळसा, कढीपत्ता, फापट, चित्रक, निरगुडी, धायटी , पांढरकुडा, जाई, जुुई, कामिनी, पिंपळ, गांजण, तगर, अनंत, मेहेंदी, रूई, रातराणी, जास्वंद , डिंडूळ, देवल्री आदींसह ३० पेक्षा अधिक देशी प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. या दुर्मिळ व स्थानिक प्रजातींमुळे शहरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लागणार असून, जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे. या ठिकाणी पक्षी, प्राणी, कीटक आणि सूक्ष्म जीवांसाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास उपलब्ध होणार आहे.
शहरातील नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडणे हे महापालिकेचे प्रमुख ध्येय आहे. घनवन प्रकल्पासारखा उपक्रम शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. शहरातील इतर उद्यानांमध्ये देखील या उपक्रमाची पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
घनवनामध्ये वेगवेगळ्या देशी व दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली असून, त्यांचे जतन व संवर्धनाचे काम उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. महापालिकेच्या तसेच शहरातील इतर उद्यानांमधील मोकळ्या जागेत अशा दुर्मिळ व औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
- महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधिक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.