दि . ११ ( पीसीबी ) – पाकिस्तानने लष्करी तळांवर मारा करण्यासाठी हवेत सोडलेले ड्रोन्स, हवेत डागलेली क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानांचा हल्ला परतावून लावत तितक्याच जोराने प्रतिहल्ला करुन भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले होते. तब्बल चार दिवस भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून एकमेकांवर हवाई हल्ले सुरु होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ‘आम्ही युद्ध जिंकल्याच्या’ फुशारक्या मारत असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्याच घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानला भारत आता काहीतरी भयंकर करेल, अशी भीती वाटायला लागली होती. त्यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. त्यानंतर अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करुन चर्चेला सुरुवात केली. अखेर शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या महासंचालकांनी हॉटलाईनवरुन एकमेकांशी चर्चा करुन शस्त्रसंधीचा निर्णय घेतला.
या सगळ्यानंतर युद्धाची प्रचंड खुमखुमी असलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी इतक्या लवकर कसा राजी झाला, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 10 मे रोजी सकाळी भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी हवाई तळांवर हल्ला केला होता. यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. रावळपिंडीजवळच्या चकलाला आणि सरगोधा या दोन तळांवर भारतीय वायूदलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये दोन्ही हवाई तळांचे मोठे नुकसान झाले होते. या दोन्ही हवाई तळांवरील धावपट्ट्या नष्ट झाल्या होत्या. चकलाला आणि सरगोधा हवाई तळांवर पाकिस्तानी सैन्यासाठीचा दारुगोळा आणि लढाऊ विमानांसाठीची विशेष प्रणाली आहे. याशिवाय भारतीय वायूदलाने काल जैकोबाबाद, भोलारी आणि स्कार्दू याठिकाणीही हल्ला केला होता.
भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या नेटवर्कमध्ये अचानक एक बातमी फिरायला लागली. त्यानुसार भारताकडून पाकिस्तानचे अणवस्त्र केंद्र आणि या सगळ्याचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला लक्ष्य करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटात प्रचंड घबराट पसरली होती. त्यामुळे भारताने हल्ला करण्यापूर्वीच पाकिस्तानने अमेरिकेशी संपर्क साधला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकाला गेल्याने अणवस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, याची भीती अमेरिकेला होती. त्यामुळे अमेरिका सातत्याने या दोन्ही देशांच्या संपर्कात होती. भारत पुढच्या टप्प्यात पाकिस्तानच्या अणवस्त्रांना लक्ष्य करु शकतो, हे कळाल्यानंतर अमेरिकेने वेगाने हालचाली करत भारताची समजूत काढली.