पुढची ३०-४० वर्षे भाजपाचीच

0
355

– घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आणि लांगूनचालनाचे राजकारण हे सर्वात मोठे पाप

हैदराबाद दि. ४ (पीसीबी) – पुढील ३० ते ४० वर्षांचा कालखंड हा भाजपचा असेल आणि भारत ‘विश्‍व गुरू’ बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केले.घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आणि लांगूनचालनाचे राजकारण हे सर्वात मोठे पाप होते आणि देशाच्या वर्षानुवर्षाच्या दु:खामागील कारणही होते, असे शहा यांनी राजकीय ठराव मांडताना सांगितले. बैठकीचा आज दुसरा दिवस होता. शहा यांच्या भाषणाबद्दल पत्रकारांना माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्‍हणाले, की देशातील अनेक निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचा उल्लेख शहा यांनी केला. यातून पक्षाच्या विकास आणि कामगिरीच्या राजकारणाला लोकांची मान्यता असल्याचे अधोरेखित झाले आहे. घराणेशाही, जातीयवाद आणि लांगूनचालनाचे राजकारण संपविण्याचे आवाहन त्यांनी केले.

अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांवरही निशाणा साधत विरोधी पक्ष आज विखुरलेले असल्याचे म्हटले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी त्यांचेच सदस्य आज लढा देत आहेत. गांधी कुटुंबीय घाबरलेले असल्याने अध्यक्षपदाची निवड करीत नाही. सर्जिकल स्ट्राईक, हवाई हल्ला, काश्‍मीरमधून ३७० कलम रद्द करणे किंवा कोरोनारोधक लसीकरण अशा केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांना आजची हताश व निराश काँग्रेस विरोध करीत आहे. काँग्रेसला ‘मोदी फोबिया’ झाला असून देशहिताच्या निर्णयांना हा पक्ष विरोध करीत आहे.

शंकराशी मोदींची तुलना – गुजरातमधील दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाचा उल्लेख करीत व तो ऐतिहासिक असल्याचे सांगितले. राजकारणाने प्रेरित या प्रकरणाविरोधात मोदी यांनी १९ वर्षे लढा दिला, पण चकार शब्दही काढला नाही. भगवान शंकराप्रमाणे त्यांनी (मोदी) विष गळ्यात उतरविले. ‘एसआयटी’चा सामना केला, अपमान सहन केला पण राज्यघटनेबद्दल निष्ठा कायम ठेवली. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाचे नाटक केले, अशी टिप्पणी शहा यांनी राहुल गांधी यांना उद्देशून केली.

दक्षिणेत भाजपची सत्ता येईल – तेलंगण, पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांमधील कौटुंबिक सत्ता भाजप संपुष्टात आणेल. केंद्रात २०१४मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरही आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशासह ज्या राज्यांमध्ये सत्तेबाहेर राहावे लागले तेथे आता भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. भाजपचा पुढील विस्तार हा दक्षिण भारतातून होईल, अशी सामूहिक आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला असल्याचे सरमा म्हणाले.