पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल

0
105

मुंबई, दि. ७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना-भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितलं. युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही, असं अजित पवार यांनी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

महायुतीचे भवितव्य आणि तिची दिशा, विशेषत: नेतृत्व आणि वैचारिक भूमिकेबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वाढत चाललेल्या चर्चेवर अजित पवारांच्या वक्तव्याने प्रकाशझोत टाकला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीला नजीकच्या काळात टीकेला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या पारंपरिक धर्मनिरपेक्ष भूमिकेशी विसंगत मित्रपक्षांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवरुन ही टीका झाली. “आम्ही युतीवर चर्चा सुरू केली तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितले की आमची विचारधारा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे आणि आम्ही तिच्याशी अजिबात तडजोड करणार नाही.” असं अजित पवार म्हणाले.
तेव्हा धर्मनिरपेक्ष विचार कुठे होते?

काँग्रेस आणि अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी एकत्रित शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि पुरोगामी विचार कुठे होता?” असा सवाल अजित पवार यांनी केला. “२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शरद पवार यांनी बाहेरुन पाठिंबा दिल्यामुळेच स्थापन झाले,” असे अजितदादांनी अधोरेखित केले.

नेतृत्वाच्या प्रश्नावर, विशेषत: महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत बोलताना अजित पवार यांनी युतीचे प्राथमिक लक्ष आगामी निवडणुकीत बहुमत मिळवण्यावर असल्याचे म्हटले. “मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा असेल, परंतु चेहरा ठरवणे ही सध्याची प्राथमिकता नाही” त्यामुळे महायुती एका धोरणात्मक अवस्थेत असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत यश मिळेपर्यंत नेतृत्वावर चर्चा थांबवल्याचे पाहायला मिळते”

जागा वाटपाची चर्चा गुणवत्तेवर आधारित असेल. एखाद्या मतदारसंघात बळकट स्थान असलेल्या पक्षाला प्राधान्य दिले जाईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या किंवा प्रभावी ठरलेल्या ६० जागा लढवण्याचे राष्ट्रवादीचे ध्येय असल्याचा पुनरुच्चार अजितदादांनी केला.