पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ कम्युनिटी रेडिओ केंद्राचा सोमवारी शुभारंभ

0
218

संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या आवाजाने होणार प्रसारण सुरू

पिंपरी, दि. २५ (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे उद्घाटन सोमवारी (दि. २९) प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

‘रिफलेक्टिंग यू’ हे ब्रीदवाक्य असणार्‍या कम्युनिटी रेडिओ इन्फिनिटी ९०.४ एफ.एम. हे केंद्र अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे असून समाजाने समाजासाठी चालविलेेला रेडिओ असे याचे स्वरुप आहे. संस्थेतील विद्यार्थी, प्राधापक, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून हे रेडिओ केंद्र चालविण्यात येणार आहे. या माहिती केंद्राच्या निर्मिती व्यवस्थापिका म्हणून माधुरी ढमाले – कुलकर्णी या जबाबदारी घेणार आहेत असेही पीसीईटीसीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले की, या केंद्रावरून शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, आर्थिक साक्षरता, सामाजिक कार्य, सेवाभावी संस्थांचे उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. या रेडिओ केंद्राचे प्रसारण आकुर्डी येथील संस्थेच्या केंद्रापासून १५ कि.मी. परिसरात ऐकता येईल.
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत अग्रेसर ठरण्यासाठी आणि वैयक्तिक संस्थेबरोबरच आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास व्हावा. या व्यापक उद्देशाने या कम्युनिटी रेडिओची स्थापना करण्यात आलेली आहे. समाजाने समाजासाठी चालविलेला हा रेडिओ प्रत्येकाला आपल्या कलागुणांना तपासून पाहण्याचा आणि ते कलागुण सादर करण्याचा अनुभव देण्यासाठी सूसज्ज झालेला आहे.
पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनी सांगितले की, संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांसह संस्थेची संबंधित प्रत्येक व्यक्ती या रेडिओच्या कार्यक्रम निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकते.
पिंपरी चिंचवड आणि परिसरातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आणि तिथे व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे दोन्ही पातळीवर हा कम्युनिटी रेडिओ सक्रिय असणार आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली याची स्थापना करण्यात आली आहे.