पीजी रूममध्ये घुसून चोरी करणा-या सराईत चोरट्यास अटक

0
254

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – पहाटेच्या वेळी पीजी मध्ये राहणा-या तरुणीच्या रूममध्ये घुसून मोबाईल फोन, अंगठी चोरून नेणा-या एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी सातारा येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा 50 हजारांचा मुद्देमाल आणि कार जप्त करण्यात आली आहे. ओंकार शिवाजी खरात (वय 21, रा. बोडके वाडी, माण हिंजवडी. मूळ रा. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लक्ष्मी चौक, मारुंजी येथे एसएस पीजीमध्ये फिर्यादी 23 वर्षीय तरुणी राहते. ती आयटी कंपनीत नोकरी करत आहे. 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडून तिच्या खोलीत आला. तो खोलीतील कपाट उचकटत असताना आवाज झाल्याने तरुणी जागी झाली. त्यानंतर आरोपीने तिला दम देऊन तिच्याकडे काय आहे, असे विचारले. तरुणीने तिच्याकडे सोन्याची अंगठी असल्याचे सांगितले असता आरोपीने ती काढून घेतली. तसेच तिचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. जाताना आरोपीने खोलीला बाहेरून कडी लावून घेतली.

घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील 72 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात आरोपीच्या येण्याजाण्याचा मार्ग काढला. आरोपी राहत असलेल्या ठिकाणी 350 भाड्याच्या खोल्या आहेत. तिथले अनेकजण ओला-उबरसाठी कार वापरत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एकाने आरोपीला ओळखले. त्याची ओळख पटवून त्याचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्याला सातारा येथून अटक केली.

आरोपी ओंकार खरात हा सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर सन 2020 मध्ये विटा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा तर सन 2022 मध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, संदीप देशमुख, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, संजीव सावंत, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव, सागर पंडित यांनी केली.