पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना व्यवसाय करणे सुलभ, स्थानिक दुकाने, लहान आस्थापनांना वाय-फाय प्रदाते होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत पीएम-वाणी योजनेतंर्गत शहरातील नागरिकांना 5G वाय-फाय सेवा देण्यासंदर्भात संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिका-यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ राजेश पाटील यांना प्रस्ताव दिला आहे. स्मार्ट सिटीने हा प्रस्ताव स्वीकारल्यास ‘पीएम-वाणी’ योजनेतंर्गत नागरिकांना 5G वाय-फायची सेवा मिळणार आहे.
स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपमहासंचालक विक्रम मालविया, पुणे विभागाचे टेलिकॉम अधिकारी जयकुमार थोरात, स्मार्ट सिटीचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांच्यासह सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
‘सर्वांसाठी ब्रॉडबँड’ कार्यान्वित करण्यासाठी सार्वत्रिक ब्रॉडबँड प्रवेश सुरक्षित करण्यासाठी “राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन” किंवा “राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियाना” ची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रांतील सर्वांगीण वाढीसाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी हा महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण-शहरी आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील डिजिटल भेद दूर करण्यासाठी देशभरात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सक्षम करणे आवश्यक आहे. यामुळे सुशासन, पारदर्शकता, आर्थिक समावेशन आणि व्यवसाय करणे सुलभ होईल. यामुळे विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये नागरिकांचा सामाजिक-आर्थिक विकास झाला आहे. या अनुषंगाने, भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत पीएम-वाणी योजनेतंर्गत प्रस्ताव स्मार्ट सिटीला प्राप्त झाला असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक सुसज्ज वायफाय व्यवस्था उभी करून मनपा मुख्य इमारत, सर्व क्षेत्रिय कार्यालये, मनपा हॉस्पीटल, गार्डन तसेच आयसीसीसी आदी ठिकाणी संपूर्ण शहर जोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण 270 ठिकाणी सिटी वाय फाय बसविण्यात आलेले आहेत. या प्रकल्पातंर्गत वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम-वाणी)च्या फ्रेमवर्क अंतर्गत सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून ब्रॉडबँडचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे मंजुर असलेला प्रकल्प जोडला जावा, याबाबत दूरसंचार विभाग विचाराधीन आहे. मजबूत डिजिटल कम्युनिकेशन आधारभूत संरचना तयार करण्यासाठी पीएम-वाणी फ्रेमवर्क सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट प्रदात्यांच्या माध्यमातून ब्रॉडबँडची तरतूद आहे. यामध्ये पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ), पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर (पीडीओए), ॲप प्रदाता आणि सेंट्रल रजिस्ट्री सारख्या घटकांचा समावेश देखील आहे.