पीएम नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा नेता नाही

0
276

नाशिक, दि. १५ (पीसीबी) – गेल्या नऊ वर्षांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक कामे होत आहेत. त्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. सरकारमध्ये असल्याशिवाय राज्यातील प्रश्न सोडविणे शक्य होणार असल्याचे सांगत पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले आहेत. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसच्या मध्यमातून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन हे करण्यात आले. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला त्यांनी राज्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याचे सांगत पेरण्या नगण्य झाल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून देशात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. अनेक कामे होत आहेत, अनेक प्रकल्प राज्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे, तो नाकारता येणार नाही. वंदे भारत एक्सप्रेसने येत असताना अनेक लोकांशी चर्चा केली. त्यानुसार रेल्वेत अनेक लोक साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba) जात होते. त्यांनी सांगितलं की, वंदे भारत रेल्वेची सर्व्हिस चांगली आहे. अशा सुविधा लोकांना दिल्या पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. त्यामुळे देशातच नव्हे जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा असून नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.