नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचा आता पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींमध्ये समावेश झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून निवदेनाद्वारे याची घोषणा केली आहे. फंडाच्या ट्रस्टींमध्ये यापूर्वी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, माजी लोकसभा उपाध्यक्ष करिया मुंडा या मान्यवारांचा समावेश आहे.पीएमओनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींचं स्वागत केलं आहे. या ट्रस्टींमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही इतर ट्रस्टींमध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर एका दिवसानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी पीएम केअर फंडाच्या मदतीनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर सादरीकरण करण्यात आलं. या बैठकीला रतन टाटाही उपस्थित होते. नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडाच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळेल, असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
ट्रस्टने पीएम केअर्स फंडासाठी सल्लागार मंडळाच्या स्थापनेसाठी पुढील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती त्याचबरोबर टीच फॉर इंडियाचे सह-संस्थापक, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे.