पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गावरील बीआरटी बस थांबे अस्वच्छ झाले असून पीएमपीएमएलच्या पिंपरी आगाराच्या वतीने बीआरटी बस थांबे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध मार्गावरील 83 बीआरटी बस थांब्यांची स्वच्छता केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रवासी सेवेसाठी पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा कार्यरत आहेत. पीएमपीमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. शहरात निगडी ते दापोडी, काळेवाडी ते स्पाइन रोड, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड अशा चार मार्गावर बीआरटी सुरू आहे. या मार्गावर 83 बीआरटी बस थांबे आहेत. बीआरटी बस थांबे अस्वच्छ झाले असून धुळीने माखले आहेत. या अस्वच्छतेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेऊन पीएमपीएमएलच्या पिंपरी आगाराच्या वतीने शहरातील बीआरटी बस थांबे स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यासाठी पिंपरी आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे यांच्या संकल्पनेतून डी.एम.ई. रामकुमार माने, मुलानी फिटर यांनी सर्व्हिस व्हॅन कम वॉशिंग व्हॅन तयार केलेली आहे. या व्हॅनमध्ये दोन हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकीची आणि मोटरची व्यवस्था करण्यात आली आहे.