पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध

0
3

बस दरवाढीमुळे प्रवासी घटतील, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढेल.. आप चा दरवाढ विरोध

पुण्यात स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच धोरण राबवा : आप

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपीएमएल ने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. संचालक मंडळाने याबाबत ठराव करून बसचा किमान तिकीटदर ५ रुपये ऐवजी १० रुपये केला आहे. तसेच दैनंदिन पास ४० रुपये वरून वाढवून ७० रुपये केला आहे आणि मासिक पास मध्ये ९०० रुपयावरून तब्बल १५०० रुपये पर्यंत दरवाढ केली आहे. ही दरवाढ सामान्य पुणेकरांची कंबर मोडणारी आहे. असे सांगत आज रविवार रोजी सकाळी आम आदमी पार्टी तर्फे पुणे येथे स्वारगेट चौकामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.

प्रशासनाने वार्षिक तूट कमी करण्यासाठी आणि दर कीफायतशीर सुटसुटीत करण्यासाठी ही दरवाढ केल्याचे सांगितले होते. परंतु या दरवाढीमुळे मुख्यत्वे सामान्य माणूस व रोजंदारीवरील कामगारांना याचा फटका बसून खाजगी दुचाकी वाहने घेण्याकडे त्याचा कल राहील. त्यातून अधिकाधिक वाहतूक कोंडी व प्रदूषण होईल. पुणे शहराचा जागतिक वाहतूक कोंडीत चौथा नंबर आहे, असे असताना याविषयी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे व अधिकाधिक प्रवासी याचा वापर करतील यासाठी प्रयत्न करणे हे प्रशासनाचे धोरण असायला हवे. २०१४ पासून दैनिक प्रवाशांचा आकडा हा दहा ते अकरा लाखाच्या दरम्यानच रेंगाळला आहे.
तूट कमी करण्यासाठी उत्पन्नाचे इतर मार्ग अधिक कार्यक्षमतेने वापरायला हवेत. मेट्रो साठीची एंड माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे शेवटच्या टप्प्यातील प्रवासाच्या सुविधा द्यायला हव्यात, त्या ऐवजी ती जबाबदारी टाळण्याकडे पीएमपीएमएल आणि मेट्रोचा ही कल आहे. प्रशासनाने भ्रष्टाचार व अकार्यक्षमता असणाऱ्या बाबी दूर करीत अधिक बसेस रस्त्यावर आणायला हव्यात. यातून पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.

सध्या लक्झेमबर्ग, माल्टा, फ्रान्स इटली, ब्राझील आदी देशांमध्ये सार्वजनिक प्रवास हा मोफत करण्याकचे धोरण आहे. आपल्याकडे महानगरपालिका ही तूट भरून काढत असताना म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या सामान्य जनता याचे पैसे मोजत असताना प्रवाशांवर याचा बोजा देण्याची गरज नाही.

याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी प्रवासी संघटना व प्रवासी, राजकीय पक्ष यांची मते घेऊन ही दरवाढ फेटाळावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली आहे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळेस देण्यात आला.

या आंदोलनात आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, वाहतूक आघाडीचे सेंथिल अय्यर, निलेश वांजळे,नौशाद अंसारी, उमेश दीक्षित, सुभाष करांडे, सुनील सवदी, प्रशांत कांबळे, सतीश यादव, अली सय्यद, किरण कद्रे ,शंकर थोरात, अमित म्हस्के, निखिल खंदारे, मनोज शेट्टी, अक्षय म्हस्के, सत्यवान शेवाळे, सत्यम शिकर, शिवम शिंदे,ऋषिकेश मारणे, शीतल कांडेलकर, संजय रणधीर, शेखर ढगे,अशोक धुमाळ, संजय कटरनवरे, गणेश थरकुडे,अनिल कोंढाळकर, सुशील बोबडे आदी उपस्थित होते.