पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पूर्व पीसीएमटीच्या आणि आत्ता पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलकडे) असलेल्या 118 कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कायम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कर्मचा-यांप्रमाणेच या कर्मचा-यांना इतर-सोयी सुविधा मिळणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला. महापालिका सेवेत कायम झालेल्यांमध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण झाले. त्यानंतर पीसीएमटीचे 235 कर्मचारी 1999 मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तत्कालीन आयुक्तांचे मान्यतेने वर्ग करण्यात आले होते. पीएमपीएममधील 235 कर्मचाऱ्यांपैकी 117 कर्मचारी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. उर्वरित 118 कर्मचारी सद्यस्थितीत महापालिकेच्या सेवेत कामकाज करत आहेत. या सर्व कर्मचा-यांची महापालिकेत अनेक वर्षे सेवा झाली आहे. या कर्मचा-यांची आस्थापना पीएमपीएमएलकडे होती. त्यामुळे महापालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे या कर्मचा-यांना सोयी-सुविधा, लाभ मिळत नव्हते.
या 118 कर्मचा-यांची महापालिका आस्थापनेवर घेण्याची काही वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी वारंवार चर्चा केली. पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांच्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली. कर्मचा-यांची परिस्थिती समजावून सांगितली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 118 कर्मचा-यांना महापालिका आस्थापनेवर कायम केले. 118 पैकी 7 कर्मचारी मागील आठवड्यातच महापालिका सेवेत कायम झाले. ते सेवानिवृत्त होणार असल्याने ते लाभापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना अगोदर कायम केले होते. उर्वरित 111 कर्मचा-यांना महापालिकेत कायम करण्याचे आदेश नुकतेच काढले. त्यामुळे महापालिकेच्या सेवेत कायम झालेल्या या कर्मचा-यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ मिळतील. कर्मचारी महापालिकेच्या आस्थपनेवर राहतील. त्यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.