पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली..

0
679

– राहुल रंजन महिवाल यांची नियुक्ती

पुणे, दि. १८ (पीसीबी) : पुणे व पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्यातील महाआघाडी सरकारने नियुक्त केलेल्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका शिंदे- फडणवीस सरकारने आजही सुरू ठेवला आहे. अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने त्यांना बदलण्यात आल्याची चर्चा आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीचा आदेश दोन दिवसांपूर्वी आला, आज पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवसे यांना बदलण्यात आले.
राज्य सरकारने पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या असून पुण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पुणे महानगर प्राधिकरणाच्या आयुक्तपदी राहुल रंजन महिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त सुहास दिवसे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही. महिवाल हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2005 मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते.

दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला.
नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांना महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांना नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. मुंबई महानगर प्राधिकरणाणे सहआयुक्त राहुल कर्डिले यांना वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तेथील विद्यमान जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनाही नियुक्तीविना ठेवण्यात आले आहे. तसेच नांदेडचेही जिल्हाधिकारी पद या बदल्यानंतर रिक्त राहिले आहे.