निगडी, दि. २३ (पीसीबी) – पीएमआरडीए कार्यालयात एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना 16 मार्च 2023 रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुख्य अभियंता यांच्या दालनामध्ये घडली.
अशोक मारुतीराव भालकर (वय 55) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र जगताप (वय 45) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालकर हे पीएमआरडीएमध्ये मुख्य अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दालनात 16 मार्च रोजी दुपारी एक बैठक सुरु होती. मुख्य ठेकेदार कुणाल भोसले याच्या सोबत रामचंद्र हा आला होता. फिर्यादी यांची परवानगी न घेता त्याने फिर्यादी याच्या दालनात जबरदस्तीने येऊन त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मी तुम्हाला बघून घेतो असे म्हणत आरडा ओरडा करून गोंधळ घालत सरकारी कामत अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.