पुणे, दि. ३१ (पीसीबी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमांना प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने आज (सोमवारी) प्राधिकरण सभेसमोर ठेवण्यास मान्यता दिली आहे. एकूण 407 पदांच्या आकृतीबंधामध्ये 157 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. तर, उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील.
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव वित्त तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला , सह आयुक्त बन्सी गवळी, स्नेहल बर्गे , मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारा सविता नलावडे प्रत्यक्ष तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दोन्ही पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण हे व्हिडिओ कॅान्फरन्स द्वारे उपस्थित होते.
या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतीबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला. मार्च महिन्यात होणार्या प्राधिकरण सभेत आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला शासन मान्यता मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वत:चे कर्मचारी अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदाचे उप महासंचालक प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केले.
या समिती मध्ये सेवा निवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी प्रमोद रेंगे, सेवा निवृत्त उप जिल्हाधिकारी मुकेश काकडे यांनी सदस्य म्हणून व उप मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांनी सचिव म्हणून काम केले.
उप अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक अशी विविध पदे थेट पद्धतीने एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. एकूण 407 पदांच्या आकृतीबंधामध्ये 157 पदे सरळ सेवेने भरली जाणार असून तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचार्यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसांना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पीसीएनटीडीएचे 40 कर्मचारी कार्यरत असून 50 अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.