पीएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ आणि ३०, ३२ मधील शिल्लक सदनिकांना प्रतिसाद
पुणे, दि. 16 (पीसीबी) : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण पीएमआरडीए अंतर्गत सेक्टर १२ आणि ३०, ३२ या ठिकाणी गृह प्रकल्प उभारला आहे. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या शिल्लक सदनिकांची लॉटरी योजना शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. गेल्या चार दिवसांमध्ये या सदनिकांसाठी विविध विभागातून जवळपास ७०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, अनामत रक्कम अद्याप कोणी भरली नसल्याचे स्पष्ट झाले. तरी, घरांसाठी हा प्रतिसाद चांगला असल्याचे जमीन व मालमत्ता विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सेक्टर १२ या ठिकाणी दुसरा टप्प्यात घरांची बांधणी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील जवळपास साडेसहाशे घरे रिकामी आहेत. त्याचप्रमाणे सेक्टर ३०, ३२ या ठिकाणीही जवळपास सातशे घरे रिकामी आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांची लॉटरीच्या माध्यमातून सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, घरांच्या किमती आणि एकूणच कामाच्या दर्जाबाबत विविध प्रश्न उठवले गेले होते. मात्र, पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरांची आवश्यकता असलेले अनेक नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. संबंधित घरांची सोडत म्हाडा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांनी याबाबत नोंदणी केली आहे. त्यानंतर आता कागदपत्रांची जुळवाजुळव करून अनामत रक्कम भरू शकतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शनिवार व रविवार या दिवशी नोंद कमी झाली होती. मात्र गेला दोन दिवसांमध्ये त्यात वाढ होऊन ती आता सातशेपर्यंत पोचली आहे. नागरिकांना कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राधिकरण प्रशासनाकडून वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नोंदणी झाल्यानंतर त्याची माहिती देखील घेण्यात येत आहे. प्रत्यक्षामध्ये नोंदणी प्रक्रिया सुकर होवून नागरिकांनी प्रतिसाद चांगला दिल्यामुळे अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकूण १३३७ घरासाठी ही लॉटरी असुन, १२ नोव्हेंबर पर्यंत अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.