पीएमआरडीएकडून महापालिकेकडे हस्तांतरित विकसित मिळकती ‘फ्री होल्ड’ करा

0
3

भाजपाचे अमोल थोरात यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि . ६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पीएमआरडीएकडून हस्तांतरित झालेल्या सर्व विकसित मिळकतींना तात्काळ ‘फ्री होल्ड’ दर्जा प्रदान करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी अमोल थोरात यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे शहरातील हजारो मिळकतींवर आकारण्यात येणारे हस्तांतर शुल्कामुळे नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार वाढत आहे.

तत्कालीन पीसीएनटीडीएचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर विकसित मिळकती, प्रकल्प महापालिकेकडे वर्ग झाले. मात्र शासनस्तरावर वेळोवेळी आश्वासन मिळूनही या मिळकतींना अद्याप ‘फ्री होल्ड’ दर्जा देण्यात आलेला नाही. परिणामी, मिळकत हस्तांतरणाच्या वेळी नागरिकांना अतिरिक्त ‘हस्तांतरण शुल्क’ (Transfer Charges) भरावा लागत असून मोठा आर्थिक ताण पडत आहे.

महापालिका सर्व नागरी सुविधा पुरवत असताना संबंधित मिळकती अजूनही फ्री होल्ड न केल्या जाणे हे अन्यायकारक आहे. या रखडलेल्या प्रक्रियेचा थेट परिणाम मिळकत व्यवहारांवर होत आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडून महापालिकेकडे हस्तांतरित सर्व विकसित मिळकतींना त्वरित ‘फ्री होल्ड’ दर्जा द्यावा. यासाठीचा आवश्यक शासननिर्णय (G.R.) येत्या अधिवेशन काळात काढण्यात यावा. नागरिकांवर आकारला जाणारा ‘हस्तांतरण कर’ पूर्णपणे रद्द करावा किंवा त्यात मोठी सवलत देऊन आर्थिक भार कमी करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

मिळकती फ्री होल्ड झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ बनेल,” असे निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले आहे.