पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

0
134

सांगवी, दि. 24 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने दोघांना जुनी सांगवी येथून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय 22, रा. जुनी सांगवी), अनिकेत सतीश काजवे (वय 28, रा. जुनी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार नितीन गेंगजे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील प्रियदर्शनी नगर येथे दोघेजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहित आणि अनिकेत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.