पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

0
127

30 जुलै (पीसीबी) देहूरोड,
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने देहूरोड मधील सेन्ट्रल चौक ते साईनगर दरम्यानच्या रस्त्यावरून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.

ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे (वय 25, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. तसेच त्याने स्वतःजवळ पिस्तुल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचने ऋषिकेश याला देहूरोड मधील सेन्ट्रल चौक ते साईनगर दरम्यानच्या रस्त्यावरून अटक केली. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तुल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.