पिस्तुलाच्या धाकाने कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

0
255

भाजीपाला आणण्यासाठी जात असलेल्या कामगाराला रस्त्यात अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले. ही घटना 22 मार्च रोजी खालुम्ब्रे येथे घडली होती. या प्रकरणातील दोघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

निखिल नंदु बोत्रे (रा. खालुम्ब्रे, ता. खेड, जि. पुणे), प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे (रा. खराबवाडी, ता. खेड, जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी सायंकाळी प्रवीण देवराव भंडारवाड हे भाजीपाला आणण्यासाठी खालुम्ब्रे बाजारपेठ येथे पायी चालत जात होते. त्यांना रस्त्यात अडवून आरोपींनी पैशांची मागणी केली. प्रवीण यांनी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले असता आरोपींनी त्यांना दमदाटी करून मारहाण केली आणि खिशातून 1500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. प्रवीण यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी आरोपींनी पिस्तूल दाखवत लोकांनाही मारण्याची धमकी दिली. जमा झालेले लोक तिथून घाबरुन पळून गेले. त्यानंतर ते दोघेही प्रविण भंडारवाड यास, तु घडला प्रकार जर कोणाला सांगितला तर तुला आम्ही जिवे ठार मारुन टाकू असे बोलून पळून गेले.

या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल व तीन काडतुसे, 1500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 3) शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक किरण शिंदे, जितेंद्र गिरनार, पोलीस अंमलदार राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, प्रकाश चाफळे, राजु जाधव, संतोष काळे, किशोर सांगळे, पवण वाजे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम, शेखर खराडे, अमोल वेताळ, सुप्रिया शिंदे यांनी केली आहे.