सांगवी,दि.०२(पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चार जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पीडब्ल्यूडी मैदानाजवळ सांगवी येथे केली.
हरीश काका भिंगारे (वय 34, रा. औंध रोड, पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (वय 30, रा. नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (वय 30, रा. पाषाण, पुणे), अरविंद अशोक कांबळे (वय 42, रा. पौड, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आतिश कुडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ काहीजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मैदानाजवळ सापळा लाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.