भोसरी, दि. २० (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भोसरी गाव येथील स्मशान भूमी जवळ करण्यात आली.
महेश उर्फ अभि विनायक जाधव (वय २५, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गाव येथील स्मशान भूमीजवळ एकजण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महेश जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.









































