पिपाणी या चिन्हामुळे तुतारीचे वाजले बारा; चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाचे 9 उमेदवार पडले

0
60

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले आहेत. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचंच सरकार आलं आहे. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला 16, उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या. तर भाजपला 132, शिंदे गटाला 57 आणि अजितदादा गटाला 41 जागा मिळाल्या. राज्यात आणि महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचं दिसून आलं आहे.

पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पडले. विशेष म्हणजे या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणीला मिळाली आहेत. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याचं दिसून आलं आहे. हा घोळ झाला नसता तर शरद पवार गटाच्या आमदारांची संख्या नऊने वाढली असती.
जिंतूर

जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विजय भांबळे उभे होते. त्यांचा 4516 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 7430 मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डिकर या विजयी झाल्या.

घनसावंगी

घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे हे 2309 मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी पिपाणीला 4830 मते मिळाली. शिंदे गटाचे हिकमत उढाण हे विजयी झाले.
शहापूर

शरद पवार गटाकडून शहापूरमधून लढणारे पांडुरंग बरोरा यांनाही फटका बसला. बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 3892 मते मिळाली. परिणामी अजितदादा गटाचे दौलत दरोडा हे विजयी झाले.
बेलापूर

बेलापूरमध्येही अटीतटीची लढत झाली. शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 2860 मते पडली. त्यामुळे भाजपच्या मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.
अणुशक्तीनगर

अणुशक्तीनगरमध्येही टफफाईट झाली. शरद पवार गटाचे फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 4075 मते मिळाली. त्यामुळे अजितदादा गटाच्या सना मलिक विजयी झाल्या.
आंबेगाव

आंबेगावात शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांना पिपाणीचा फटका बसला. देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 2965 मते मिळाली. या ठिकाणी अजितदादा गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले.
पारनेर

पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके यांचा पराभव झाला. राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात पिपाणीला 3582 मते मिळाली. त्यामुळे अजितदादा गटाचे काशिनाथ दाते विजयी झाले.
केज

केजमध्येही पिपाणीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसला. पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला 3559 मते मिळाली. या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या.
परांडा

परांडा येथे शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांना अवघ्या 1509 मतांनी पराभूत व्हावं लागलं. या ठिकाणी पिपाणीला 4446 मते मिळाली. त्यामुळे शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांचा विजय सोपा झाला.