पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी, पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

0
232

स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना लिकेज सापडेना, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी, दि.७ ( पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. मोशीतील संतनगर सेक्टर नंबर चार परिसरात मागील तीन आठवड्यापासून ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. अतिशय दूषित, अळ्या असलेले पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्देव म्हणजे स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना 21 दिवसांपासून लिकेज सापडत नाही.

महापालिका चिखली आणि निगडीतील जलशुद्धीकरणातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करते. मोशी परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या भागात मोठ मोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित झाल्या आहेत. या भागात सातत्याने विस्कळीत पाणीपुरवठा राहतो. संतनगर सेक्टर नंबर 4 केंद्रीय विहार शेजारी शिंवगंगा सिद्धी अपार्टमेंटसह विविध सोसायट्या आहेत. या परिसरात होणारा पिण्याच्या पाणीपुरवठ्यात गेली तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासुन ड्रेनेजचे पाणी मिक्स होत आहे. पाण्यात अळ्या येत आहेत. हे पाणी वापरण्यात आल्याने लहान मुले तसेच जेष्ठ नागरिक यांना घसा, उलट्या तसेच जुलाबाचा त्रास होत आहे.

महापालिकेच्या वतीने जेसीबी पाठवून रस्त्यावर आठ ते दहा ठिकाणी खोदकाम करण्यात आले.परंतु, ती आठवड्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी येतात, खोदतात आणि लिकेज सापडत नाही अशी परिस्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांना एवढे खोदकाम करुनही फॅाल्ट सापडत नसेल. तर ही घटना आश्चर्यकारक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणण आहे. अगोदरच एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि तेही दूषित पाणी येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हजारो रुपयांचा मालमत्ता कर भरूनही नागरिकांवर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तसेच या घाण पाण्यामुळे पाण्याचा टाक्या साफ करण्याचा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.