300 सीसीटीव्ही तपासात काढला आरोपींचा माग
आकुर्डी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका पिकप चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना खेड शिवापुर मधील एका लॉज मधून अटक करण्यात आली. निगडी पोलिसांनी तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या.
आकाश मनोज लोट (वय 22, रा. मोशी), सनी उर्फ आशुतोष अशोक परदेशी उर्फ रोकडे (वय 32, रा. मिलिंद नगर, पिंपरी), अनिकेत गौतम शिंदे (वय 24, रा. पाटील नगर, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडोबा माळ चौक आकुर्डी येथे बुलेट वरून आलेल्या तिघांनी पोलीस असल्याची बतावणी करत पिकप चालकाला पिस्तुलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर आरोपींनी पिकअप चालकाकडून 7000 रुपये लुटून नेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना निगडी पोलिसांनी आरोपींचा माग काढत तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी हे खेड शिवापुर मधील एका लॉजवर थांबले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना लॉज मधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन मोबाईल फोन, दोन कोयते, आणि एक बुलेट दुचाकी असा एकूण एक लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तीनही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपी आकाश याच्यावर दोन, आरोपी सनी याच्यावर सात, तर आरोपी अनिकेत याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अनिकेत शिंदे हा पिंपरी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी होता.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, सुधाकर अवताडे, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, भूपेंद्र चौधरी, सिद्राम बाबा, तुषार गेंगजे, प्रवीण कांबळे, विनायक मराठे, सुनील पवार, केशव चेपटे, स्वप्नाली म्हसकर, सारिका अंकुश यांनी केली.