पिंपळे सौदागर, २३ मार्च २०२५: पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत, १०० हून अधिक नागरिकांनी पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील लिनियर गार्डनजवळ मानवी साखळी तयार केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदी विकास प्रकल्पाला(RFD) विरोध करत, या आंदोलनाचा उद्देश नदी प्रदूषण आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.
सकाळच्या फिरायला येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणप्रेमींनी RFD प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी माहिती दिली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. “वृक्षतोड थांबलीच पाहिजे!”, “आधी नद्या स्वच्छ करा!” आणि “नद्या वाचवू, निसर्ग टिकवू!” अशा घोषणा देत त्यांनी नदीसंवर्धनाचा संदेश दिला.
स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि जागरूक नागरिकांनी या आंदोलनात एकत्र येत, नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवण्याची मागणी केली. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी अधोरेखित केले. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे आंदोलन प्रदूषणमुक्त नद्यांसाठीच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. RFD सारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची, जैवविविधतेला धोका पोहोचण्याची आणि सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. नदीकाठी बांधकाम करण्याऐवजी कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडमधील नद्या प्रदूषण आणि दुर्लक्षिततेच्या विळख्यात अडकल्या आहेत. अनेक वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ आणि स्थानिक नागरिक यासंदर्भात आवाज उठवत आहेत, पण ठोस पावले उचलली जात नाहीत. या नद्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, मात्र त्याकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे.
याआधी ९ मार्च रोजी चिंचवडमधील चाफेकर चौकात आणि १५ मार्चला बालेवाडीत मानवी साखळी करून जनजागृती करण्यात आली होती. आज पिंपळे सौदागरमध्ये हे आंदोलन पोहोचले असून, पुढील टप्प्यात शहरातील वेगवेगळ्या भागात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
पिंपळे सौदागरमधील रहिवासी जॉन डिसोझा यांनी परिस्थितीची गंभीरता स्पष्ट करत सांगितले, “नदी ही आपली माता आहे. आपल्या आईला सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गरज आहे. कर्करोग झाल्यास आपण औषधोपचार करतो, मेकअप नाही! नदीला स्वच्छ करणे आवश्यक आहे. प्रभावी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारल्याशिवाय हे शक्य नाही. एकेकाळी आम्ही या नद्यांमध्ये पोहत होतो, पण आता त्यांची अवस्था पाहून दुःख होते. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे शुद्धीकरण आणखी विलंब न करता त्वरित केले पाहिजे.”