पिंपळे सौदागर येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण

0
295

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘मनोज जरांगे हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देत पिंपळे सौदागर येथील ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला. पिंपळे सौदागर येथील पि. के. चौकात आंदोलन करण्यात आले. पिंपळे सौदागर परिसरातील सखल मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलन केले. यामध्ये माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह ग्रामस्थांनी व युवकांनी सहभागी होत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. ठिकठिकाणी जाळपोळ, रस्ता अडविला जात आहे. काही आमच्या बांधवानी जीवाचे बलिदान दिले आहे. महाराष्ट्रात मराठा समाज सर्वात मोठा आहे. राज्यात “मराठा टिकला तरच महाराष्ट्र टिकणार” आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठ्यांची चाललेली पिळवणूक थांबली पाहिजे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण तातडीने द्यावे मराठ्यांच्या जीवाशी खेळ करू नये अशी मागणी माजी नगरसेवक नाना काटे यांनी यावेळी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहेत. मागील काही वर्षापासून मराठा बांधव आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. न भूतो न भविष्यते असा मूक मोर्चा काढून मराठा समाजाने आपली एकी सरकारला दाखवून दिले होते. मात्र, यातून तोडगा न निघाल्यामुळे आणि कोर्टाकडून टिकणारे आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाचा धगधगता अंगार आंदोलनाच्या माध्यमातून उद्रेक झाला आहे. पुन्हा एकदा मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे.