पिंपळे सौदागर भागातील विविध विकासकामांच्या निविदा काढा – नाना काटे

0
308

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक 28 रहाटणी -पिंपळे सौदागर येथील सन 2022-23 च्या अंदाजपत्रकातील विविध कामाच्या निविदा काढण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, सन 2021-22 च्या सुधारित व सन 2022-23 च्या मूळ अंदाजपत्रकातील प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथील आवश्यक असलेली विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे , तरतुदी अभावी निविदा प्रसिद्धी करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.तसेच प्रभागातील विकास होणेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

रहाटणी येथील एसएनबीपी शाळेसमोरील डीपी रस्ता,शिवार चौक ते गोविंद गार्डन  पर्यंत अद्यावत पद्धतीने काँक्रीटीकरण करणे, मुलांना वाहतूक नियमांच्या माहितीसाठी चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क तयार करणे, आरक्षण क्रमांक 367 अ व 362  खेळाच्या मैदानाचे स्थापत्य विषयक कामे करणे. महापालिका शाळा व स्मशानभूमी येथील सीमाभिंत बांधून स्थापत्य विषयक कामे  करणे, भिसे पार्क ,शिवराज नगर काटेवस्ती व विविध कॉलनी मध्ये  व रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, महापालिका शाळा सीमाभिंतीलगत शिवसृष्टी उभारणे व सुशोभीकरण करणे, विविध भागातील खडी मुरुमाचे रस्ते व एमपीएम पद्धतीने तसेच हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, खड्डे  , ट्रेंचेस , क्रॉसकट बुजविणे ,  थर्माप्लास्ट पट्टे मारणे ,बेंचेस पुरवणे,नाम फलक बसविणे, झाडे लावून चौक सुशोभित करणे व  इतर स्थापत्यविषयक कामे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सन 2022-23 च्या अंदाजपत्रकातून निविदा काढाव्यात अशी मागणी काटे यांनी केली.