पिंपळे सौदागरमध्ये रंगणार “स्वरांजली दीपावली पहाट” ची सुरेल मैफिल….

0
327

पिंपळे सौदागर, दि. ६ (पीसीबी) – दिपावली निमित्ताने धनत्रयोदशीला शुक्रवार दि. १० नोव्हेंबर आणि शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने लिनियर गार्डन,गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर याठिकाणी “स्वरांजली दीपावली पहाट” या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे पिंपळे सौदागर- रहाटणी परिसरातील रसिकांसाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनने “स्वरांजली दीपावली पहाट” ही शब्दसूरांची बहारदार गीत संगीताची सुरेल मैफिलचे आयोजन केले आहे.

या “स्वरांजली दीपावली पहाट” कार्यक्रमानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रविंद्र, सुर नवा ध्यास नवा फेम चैतन्य देवढे, हिंदी सा रे ग म पा फेम व सुर नवा ध्यास नवा विजेती अंशिका चोणकर आणि सुप्रसिद्ध गायक हिम्मत कुमार पंड्या या दिग्गज गायक गायिकांच्या सुमधुर गाण्यांची मेजवानी पिंपळे सौदागर रहाटणी वासियांना लाभणार आहे.
या कार्यक्रमात मराठी भक्तिगीते, भावगीते,अभंग या निवडक गीतांचा समावेश असणार आहे .

प्रसिद्ध पार्श्वगायक/गायिका यांच्या सुरेल स्वरांनी सजलेल्या या “स्वरांजली दीपावली पहाट” कार्यक्रमाचा लाभ पिंपळे सौदागर -रहाटणी वासीयांनी घ्यावा असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे .