पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॅान रस्त्याचा कामास लवकरच सुरुवात – नाना काटे

0
73

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) : पिंपळे सौदागर मधील रहदारीचा ”हॉटस्पॉट” मानला जाणाऱ्या कुणाल आयकॅान रस्त्याचा शिवार गार्डन ते कुंजीर चौका पर्यतच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे .या कामाची शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी संबधित महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे अधिकारी व सल्लागार यांच्या समवेत पाहणी केली. पिंपळे सौदागर भागातील हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करून काम करण्यात यावे. तसेच या रस्त्यामध्ये येणाऱ्या सेवावाहिन्यांचे पुढील 30 ते 40 वर्षांचे योग्य रीतीने नियोजन केले जावे अशा सूचना काटे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

कुणाल आयकॅान रस्त्यावरील शिवार गार्डन चौक ते कुंजीर चौक या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना शुक्रवारी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे तसेच बीआरटीएस विभागाच्या कार्यकारी अभियंत्या संध्या वाघ, उपअभियंता विजय भोजने, सल्लागार समिती इन्फ्रा किंग प्रा ली चे प्रतिनीधी लक्ष्मीकांत पतंगे, रणजीत कोल्हे तसेच परिसरातील सोसायटी मधील रहिवासी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
याबाबत नाना काटे म्हणाले शिवार गार्डन चौक ते कुंजीर चौक हा 18 मीटर रुंदीचा रस्ता अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. पिंपळे सौदागरमधील बहुतांश रस्ते अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. या भागातील मुख्य चौक आणि रहदारीचा मानला जाणारा कुणाल आयकॅान रस्ता येथील रस्त्याचे काम राहिले होते. प्राधान्याने हे काम आता हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे या रस्त्याचे काम उशिरा हाती घेण्यात आले. या परिसरात व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात आहे. अनेक छोटे मोठे व्यापारी येथे विविध प्रकारचे व्यवसाय करतात. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने छोटी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हा रस्ता या भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. तो योग्य रीतीने विकसित झाला पाहिजे अशी भूमिका सुरुवातीपासून होती. वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करून या चौकातील रस्त्याचे काम करावे लागणार आहे . सुरुवातीला हे काम करताना या रस्त्याच्या खाली असणाऱ्या सेवा वाहिन्या फूटपाथअंतर्गत घेऊन स्थलांतरित करण्याचे काम केले जाणार आहे. आगामी काळातील लोकसंख्या लक्षात घेऊन रस्त्याचे काम करतानाच जलनिस्सारण ,मलनिस्सारण, पाणीपुरवठा आणि विद्युत वाहिन्यांचे नियोजन करावे अशी सूचना अधिकाऱ्याना केली आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर या चौकाला आधुनिक चेहरा मिळणार आहे. दळणवळण सुटसुटीत होणार असून वाहतुकीची कोंडी प्रामुख्याने टाळता येणार आहे तसेच प्रदूषण कमी होईल. ————————-

पिंपळे सौदागर येथील अर्बन स्ट्रीट अंतर्गत कुणाल रस्त्याचे शिवार गार्डन ते कुंजीर चौक रस्ता काँक्रीटीकरणाने विकसित करण्याचे नियोजन आहे. सध्या निविदा प्रक्रिया चालू असून ती अंतिम टप्यात आहे. काम चालू होण्यास साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून तीन वर्षांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे . तसेच आगामी काळातील नियोजन डोळ्यासमोर ठेवून वाढीव व्यासाच्या वाहिन्या टाकण्यात येणार आहे.