पिंपळे निलख मधील कुटुंब जाणार कार ने पिंपरी ते लंडनला…

0
9453

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – ‘वसुधैव कुटूंबम’ आणि ‘जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या’ हा संदेश घेऊन पिंपरी चिंचवड ते लंडन या रोड मार्गे प्रवासास शहरातील एक कुटुंब येत्या बुधवारी (ता.३०) प्रारंभ करणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराचे प्रेरणास्थान असलेल्या चाफेकर पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त शेखर सिंग, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे ,शहर भाजपाध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे झेंडा दाखवून या साहसी प्रवासी मोहिमेसाठी या कुटुंबाला शुभेच्छा देणार आहेत. व्यवसायाने इलेक्ट्रिक इंजिनियर असलेले विवेक सोनवणे, त्यांची पत्नी व दोन मुले हा दौरा करणार आहेत .१२० दिवसांचा व एकतीस देशांमधून प्रवास करणारे हे महाराष्ट्रातील पहिले मराठी कुटुंब असणार आहे. या प्रवासासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी करण्यात आली असून सर्व देशांचा व्हिसा ,प्रवास होणाऱ्या सर्व देशांचे चलन तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी असणाऱ्या सर्व कायदेशीर परवानग्या नुकत्याच त्यांच्या पूर्ण झाल्या आहेत. शहर वासियांना अभिमान वाटणारा हा साहसी व रोमहर्षक प्रवास ते दुबई, इराण, तुर्की ,बल्गेरिया, डेन्मार्क जर्मनी ,स्वित्झर्लंड, इटली फ्रान्स आणि लंडन असा करणार आहे. या प्रवासाअंतर्गत तीन वेळा बोटीतून व एकदा समुद्राखालून जाणाऱ्या रेल्वेतून (कार समवेत) त्यांचा प्रवास होणार आहे.