पिंपळेनिलख येथील रक्षक चौकात फडकणार 100 फुटी उंच तिरंगा.

0
250

पिंपरी, दि.17 (पीसीबी) : पिंपळे निलख येथील रक्षक चौकात बीआरटीएस रस्त्यालगत मिलीटरी हद्दीत 100 फूट उंच भारतीय ध्वज तिरंगा फडकण्यास केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे. त्याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

औंध मिलिटरी कॅम्प येथील भारतीय लष्करातील जवान आणि स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून रक्षक चौक येथे तिरंगा उभारावा, अशी मागणी होत होती. महापालिका प्रशासनाच्या वतीने मिलीटरी हेड क्वार्टर 330 इनफॅन्ट्री ब्रिगडचे कर्नल लेफ्टनंट यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सदर प्रस्तावाबाबत विचार होऊन त्यास मान्यता मिळवून केंद्रीय गृहमंत्रालयाचे सेक्रेटरी प्रेम प्रकाश यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत पत्राद्वारे रक्षक चौकामध्ये शंभर फुटी भारतीय ध्वज कायमस्वरुपी फडकविण्यास परवागनी दिली आहे.

प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख येथील रक्षक चौकात ‘बीआरटीएस’ रस्त्यालगत मिलिटरी हद्दीत भारताचा राष्ट्रध्वज उभारणे तसेच इतर स्थापत्य अनुषंगिक कामे करणे आदी कामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. या कामास प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती. तसेच अंदाजपत्रकात तरतूद करून कामाचे आदेशही देण्यात आले आहेत.

भारतीय ध्वज हा देशभक्ती आणि समर्पण भावनेचे प्रतिक आहे. रक्षक चौकात तिरंगा उभारण्यास मंजुरी मिळाल्यामुळे औंध मिलिटरी कॅम्प येथील भारतीय सैन्य आणि स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ध्वज उभारण्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे, असे माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी सांगितले.