पिंपळेगुरवमधील लक्ष्मीनगर भागात पाणी शिरले; आयुक्त व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली पाहणी

0
79

पिंपरी : मुसळधार पावसामुळे पिंपळेगुरव येथील लक्ष्मीनगर भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी तातडीने नागरिकांना मदत करण्याची सूचना केल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शंकर जगताप यांनी नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी कायमस्वरूपी उपायोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 

पिंपळेगुरव येथील लक्ष्मीनगर भाग पवना नदीपासून जवळच आहे. त्यामुळे या भागात दरवर्षी पावसाचे पाणी येते. तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. आताही दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे लक्ष्मीनगर भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. ही बाब समजताच भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना फोनवरून संपर्क करून लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत पोहोचविण्याची सूचना केली. 

त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी काही मिनिटातच लक्ष्मीनगर भागाला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. आयुक्त व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी भर पावसात लक्ष्मीनगर भागात फिरून नागरिकांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शंकर जगताप यांनी या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचत असल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन शंकर जगताप यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक सागर अंगोळकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.