पिंपरी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अटकेत

0
98

पिंपरी, पिंपरी, दि २२ जुलै (पीसीबी) – पिंपरी गावात रविवारी (दि. 21) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास एक हिट अँड रनचा प्रकार उघडकीस आला. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला एका कारने धडक दिली. त्यानंतर कारचालक पळून गेला होता. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

हरीश जालिंदर वाघमारे (रा. रहाटणी) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. विजया नायर (वय 55, रा. पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, विजया नायर शिक्षिका असून क्लास झाल्यानंतर त्या पिंपरी गावात वाघेरे कॉलनी मधील शिवाजी पुतळा परिसरात पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरून पिवळी नंबर प्लेट असलेली कार आली. कारने नायर यांना धडक दिली.

या अपघातात त्या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्यांच्या अंगावर दुचाकी पडली तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नायर यांना धडक दिल्यानंतर कारने एक रिक्षा आणि एका दुचाकीला देखील धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पिंपरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तसेच गाडी नंबर दिला तरीही गुन्हा दाखल करायला पोलिसांनी उशीर लावल्याचा आरोप नायर यांच्या नातेवाईकांनी केला.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग म्हणाले, “घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालकाला पकडण्यासाठी तात्काळ पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाला ताब्यात घेतले आहे.”