पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

0
70

पिंपरी,दि.१२ (पीसीबी) – विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पिंपरी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आकुर्डी येथील कै.वसंतदादा पाटील मनपा शाळा, फकिरभाई पानसरे विद्यालय व मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालय येथे दोन सत्रात पार पाडले.

निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी आवशयक प्रक्रिया लवकर करण्याची सूचना त्यांनी केली.

क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण व ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण दिले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची माहिती, ईव्हीएम हाताळणी, निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट, व्ही व्ही पॅट चे कार्य, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल (अभिरूप मतदान), मतदान संपल्यानंतर १७ मुद्यांचा छाननी फॉर्म, एएसओ ०५ फॉर्म, मतदान केंद्र अध्यक्षांचा अहवाल भाग १ ते ३, फॉर्म १७ सी तयार करणे तसेच संविधानिक व असंविधानिक पाकिटे भरावयाची कृती याबद्दल मार्गदर्शन केले.

मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परीसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रुपरेषा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती देखील उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, प्रशिक्षण समन्वयक राजेंद्र जावळे, माध्यम समन्वयक विजय भोजने, पोस्टल बॅलेट समन्वय अधिकारी मनोहर जावरानी, मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक श्रीकांत कोळप, शितल वाकडे, सरिता मारणे, अभिजित केंद्रेकर यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक प्रशिक्षण समन्वयक प्रतिभा इंगळे यांची प्रशिक्षणास भेट

अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक प्रशिक्षण समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे यांनी प्रशिक्षणास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चाचणी मत नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.