पिंपरी महापालिकेत मोठी भरती; 386 पदांसाठी होणार भरती

0
400

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पालिकेच्या विविध विभागातील ब आणि क गटातील 386 पदांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून दरमहा 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. या पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालिका वेळोवेळी कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत आहे. पालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोसे कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून पालिकेत बंदी असलेली नोकर भरती राज्य सरकारने नुकतीच उठविली आहे. त्यामुळे महापालिकेने यापुर्वी वैद्यकिय विभागातील स्टाफ नर्स, एएनमसह इतर तांत्रिक अशा 131 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, या भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

विभागातील ब आणि क गटातील 386 रिक्त पदांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8 अशा विविध पदांवर सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. शैक्षणिक अर्हता, आरक्षण, यासह सविस्तर माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर 19 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.