पिंपरी महापालिका हद्दीत एका दिवसाला 1100 टन कच-याची निर्मिती!

0
219

पिंपरी दि. १० (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखाच्या घरात आहे. त्यामुळे दररोजच्या निर्माण होणाऱ्या कचऱ्यातही वाढ होत आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे 1100 टन कच-याची निर्मिती होत आहे.

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. शहर चहुबाजूंनी वाढत आहे. मोठ मोठे गृहप्रकल्प उभारत आहेत. स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल सुरू असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत 25 लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे दररोजच्या निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्यातही वाढ होत आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील घरोघरचा कचरा महापालिकेच्या 421 वाहनांमार्फत गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येतो.

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे 1100 टन कच-याची निर्मिती होते. मोशी कचरा डेपोमध्ये कच-याचे वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रीया केली जाते. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे, त्याची विल्हेवाट लावणे याबरोबरच सार्वजनिक रस्त्यांची दैनंदीन साफसफाई करणे, उघडी गटर, नाले यांची स्वच्छता करणे आदी कामांचा समावेश आहे.