पिंपरी महापालिका ते रेंजहील स्थानक मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी पूर्ण

0
163

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा 12 किमीचा मार्ग उन्नत असून उर्वरित मार्ग भूमिगत आहे. या 12 किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी घेणे शक्य होणार आहे. चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येईल.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या 12.64 किमी उन्नत मार्गासाठी एकूण 3934 सेगमेंट बनविण्यात आले होते. या सेगमेंटद्वारे 451 स्पॅन उभारण्यात आले. 12.64 किमीचा उन्नत मार्ग बनविण्यात आला. या मार्गावर पहिला मेट्रोचा खांब 7 ऑक्टोबर 2017 रोजी बांधण्यात आला. नाशिक फाटा येथे भव्य कास्टिंग यार्डची उभारणी करण्यात आली. ज्यात 3934 सेगमेंट बनविण्यात आले. या मार्गिकेसाठी लागणारा पहिला सेगमेंट 29 ऑगस्ट 2017 रोजी बनविण्यात आला व शेवटचा सेगमेंट 19 ऑक्टोबर 2022 रोजी बनविण्यात आला.

तसेच या मार्गावर पहिला सेगमेंट 14 डिसेंबर 2017 रोजी पिअर नं. 348-349 यामधील स्पॅनसाठी उभारण्यात आला. या सुरुवातीचा आज शेवटच्या टप्प्यात पिअर नं. 149-150 मधील स्पॅनसाठी शेवटचा (3934 वा) सेगमेंट उभारण्यात आला. अश्याप्रकारे संपूर्ण 13.064 किमी उन्नत मार्गाचे व्हायाडक्तचे काम आज पूर्ण झाले. या 12.064 किमीच्या उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करण्यात आली. सर्वात मोठी अडचण सैन्यदलाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा मिळवणे ही होती. त्यासाठी सैन्यदलाकडे निरंतर पाठपुरावा करून जुलै 2022 मध्ये मेट्रो उभारणीस जागा देण्यात आली.

सैन्यदलाकडून या मार्गास जमीन मिळण्यास विलंब झाला तरी देखील मेट्रोने काम न थांबवता रेंजहील स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे चालू ठेवली आणि वेळेत पूर्णत्वास नेली. आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि रेंजहील स्थानक ते खडकी यामधील गॅप भरण्यात येऊन व्हायाडक्तचे काम पूर्णत्वास येत आहे. कोरोना काळात सर्वच मोठे प्रकल्प ठप्प पडले आणि त्याचा फटका महामेट्रोलाही बसला. या भागामध्ये वाहतूक नियमन ही अत्यंत्य गुंतागुंतीचे होते. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून खडकी येथील वाहतूक नियमन करण्यात आले. नियोजित वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.

फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील कामे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे. त्याला अनुसरूनच आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी होत आहे. सैन्यदलाकडील जमीन, कोरोना आणि वाहतूक नियमन इत्यादी अडचणींवर मात करून नियोजित वेळेत या 12.064 किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2022 अखेर हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे शक्य होईल.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, आजचा दिवस पुणे मेट्रोच्या कामाचा महत्वाचा टप्पा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या 12.064 किमी उन्नत मार्गाच्या व्हायाडक्तचे काम नियोजित वेळात पूर्ण होत आहे. लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हील कोर्ट स्थानक या मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.