पिंपरी, दि. ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून आतापर्यंत या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला मार्च २०२३ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, या पुलाच्या बांधणीसाठी काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने कामास विलंब झाला. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे एप्रिल २०२३ मध्ये वृक्ष तोड व पुनर्रोपणासाठी सादर केलेल्या प्रस्तावास ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. पुलाच्या जागेत अडथळा ठरणारे १४२ वृक्ष काढण्यात आले तर ६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले.मंजूर आराखड्यातील जागेतील काही वृक्ष संरक्षण विभागाच्या हद्दीत असल्याने त्यांचे मूल्यांकन करून संरक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागली. वन विभागाने सप्टेंबर २०२३मध्ये मूल्यांकन पूर्ण केले आणि अखेर मार्च २०२४ मध्ये वृक्ष तोडीस परवानगी मिळाल्यानंतर मे २०२४ मध्ये १४२ वृक्ष काढण्यात आले. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले.
- पूल प्रकल्पाच्या कामासाठी जादा कालावधी लागणा-या इतर बाबी
हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने विविध मंजुरी प्रक्रियांमध्ये देखील विलंब झाला. रेल्वे विभागाच्या ओव्हर हेड इक्युपमेंट (ओएचई) व इतर संरचना बदलण्यासाठी आवश्यक मंजुरी व निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कामासाठी रेल्वे विभागाने ७४.८९ लाख इतक्या आगाऊ रकमेची मागणी केली असून, त्याची प्रक्रिया पुर्ण करून रक्कम अदा केली आहे. सद्यस्थितीत रेल्वे विभागाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात प्रक्रिया सुरू आहे. सध्या सर्व विभागांचा समन्वय साधून आता काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. - वाहनचालकांना मिळणार दिलासा
पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे विना अडथळा वाहतुकीस चालना मिळणार आहे. यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील डेअरी फार्म, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे नागरिकांना सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार असून पुणे मुंबई महामार्गावर तसेच तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलद आणि सहज पद्धतीने प्रवास करण्यासाठी मदत होणार आहे.
चौकट – प्रकल्पामुळे होणारे फायदे:
•पिंपरी व आजूबाजूच्या भागांतील नागरिकांना मुंबई-पुणे महामार्गाला सहज प्रवेश मिळेल.
•रेल्वे फाटक बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा विलंब कमी होईल.
•संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात जाणे अधिक सोपे होईल.
•इंधन आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
कोट
शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. डेअरी फार्म येथील उड्डाणपुल प्रकल्प पिंपरी चिंचवडसह संपूर्ण परिसराच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा घडवून आणेल. प्रकल्पाच्या वेळेत पूर्ततेसाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. हा पुल सर्वांसाठी खुला झाल्यानंतर पिंपरीतील वाहतुकीची समस्या आणि परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होण्यास मदत मिळणार आहे असे आयुक्त तथा प्रशाशॉक शेखर सिंह यांनी सांगितले.
डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पुर्ण करण्यावर महापालिका भर देत आहे. या कामातील अडथळ्यांमुळे होणारा विलंब लक्षात घेता ठेकेदाराने पुलाच्या कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सर्व बाबींचा विचार करून मा. आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे मुख्य अभियंता
प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.