चिंचवड, दि.६(पीसीबी)- शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात आचारसंहिता सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी जनसंवाद सभा पुन्हा सुरू करा,अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.
याबाबत विशाल काळभोर यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 18 जानेवारीपासून आचारसंहिता सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विकास कामे करण्यात कोणतीही अडचण नसल्याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवार (दि.3) रोजी आदेश काढला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील विकास कामे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आचारसंहितेमुळे बंद केलेली जनसंवाद सभा पुन्हा सुरू करावी.
याबाबत विशाल काळभोर म्हणाले महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 12 मार्च 2022 रोजी संपला. त्यानंतर राज्य सरकारने महापालिका आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली. प्रशासकीय राजवटीत नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवून घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे,
यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्याच्या सूचना दिल्या. या जनसंवाद सभांमुळे नगरसेवक नसेल तरी नागरिकांना आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले होते. जनसंवादच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न मांडून ते प्रश्न निकाली निघत होते. त्यामुळे जनसंवाद सभांना नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
नव्याने नियुक्त झालेले आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महिन्यातून दोनदाच जनसंवाद सभा घेण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता लागू होताच आयुक्तांनी जनसंवाद सभा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता आयुक्त सिंह यांनीच आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी जनसंवाद सभा पुन्हा सुरू करा, अशी आग्रही मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.