पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु

0
202

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चिंचवडचे कार्यक्षेत्र वगळून पिंपरी, भोसरीतील विकास कामांना मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीमुळे केवळ चिंचवड भागातील कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. पिंपरी आणि भोसरीतील विकास कामांना कोणताही अडथळा नाही. या मतदारसंघातील कामे सुरु आहेत.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर चिंचवड मतदार संघासाठी १८ जानेवारी रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. तथापि, पोटनिवडणुकीसाठी ३ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासक घेत असलेल्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभाही रद्द करण्यात आल्या होत्या.

पोटनिवडणुकीची आचारसंहिता चिंचवडमध्ये असताना पिंपरी आणि भोसरीतील विकास कामांना खो बसला होता. आचारसंहिता चिंचवड मतदारसंघापुरती मर्यादित असल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी, भोसरीतील विकास कामांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या भागातील कामे पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचा सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार आयुक्त सिंह हे पूर्वीप्रमाणे अधिकाऱ्यांसमवेत स्थायीची समितीची बैठक घेत नाहीत. पिंपरी, भोसरीतील आवश्यक असलेल्या विकास कामांच्या विषयांना मान्यता देतात. त्यानुसार पिंपरी, भोसरीतील कामे पुन्हा सुरु झाली आहेत.