पिंपरी, भोसरीचा निकाल दुपारी दोन पर्यत

0
6

पिंपरी, दि. दि. २२ (पीसीबी) : पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया उद्या शनिवार (दि.२३) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल समजेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बुधवारी (दि.२०) रोजी मतदान झाले आहे. आता निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी मतमोजणी कक्षाची तयारी सुरू झाली आहे. मतमोजणी टेबलांची रचना करण्यात येत आहे. टेबल कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक टेवलसाठी तीन मोजणी अधिकारी, एक शिपाई असे चारजणांचे एक पथक आहे. मोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. पिंपरीसाठी २० टेबलांवर मतमोजणी होणार असून, त्याच्या २० फेऱ्या होणार आहेत. तर भोसरीच्या मतमोजणीसाठी २२ टेबलांवर २३ फेऱ्या होतील. टपाली व इलेक्ट्रोल व्होटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र मोजणी पथकेही नेमण्यात आली आहेत.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मतदारांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे दुपारी बारानंतर निकालाचा कल स्पष्ट होईल. तसेच दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल हाती येऊ शकेल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.