पिंपरी ते सिव्हील कोर्टपर्यंत डिसेंबर महिन्यात मेट्रो धावणार

0
401

पिंपरी दि. २२ (पीसीबी) – पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावर पुणे मेट्रो डिसेंबर महिन्यात धावणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 पासून मेट्रो धावत आहे. फुगेवाडी ते दापोडी मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

पिंपरी ते फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बोपोडी, खडकी स्टेशन, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट या मार्गावर वेगात कामे सुरू आहेत. त्या मार्गाचे काम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रोची पिंपरी ते सिव्हील कोर्ट अशी चाचणी घेण्यात येणार आहे.

कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) अंतिम परवानगीनंतर साधारण डिसेंबर महिन्यात त्या मार्गावरून मेट्रो प्रवाशांसाठी धावेल. मेट्रो टप्पाटप्प्याने सुरू न करता थेट सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गावरही मेट्रो धावणार आहे. त्या प्रवासाचा तिकीट दर 30 रूपये असणार आहे.

पीएमपीएलप्रमाणे मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजना घोषित केली आहे. पाचशे रूपये भरून कार्ड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला महिन्याभरात कोठेही कितीही वेळा फिरत येणार आहे. प्रवाशी संख्या वाढावी. त्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून मेट्रोने ही योजना सुरू केली आहे.

पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गासाठी अवजड असे सेगमेंट व डक तयार करण्याचे काम नाशिक फाटा उड्डाणपुलाशेजारील पिंपळे गुरव भागातील जागेतील कास्टींग यार्डमध्ये सुरू आहे. तेथे या मार्गावरील सर्व सेगमेंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे यार्ड बंद केले जाणार आहे. मात्र, पिंपरी ते निगडी या विस्तारीत मार्गास लवकर मंजुरी मिळाल्यास यार्ड पुन्हा सुरू केले जाईल.

संत तुकाराम नगर- सॅण्डविक आशिया’ !
भोसरी स्टेशन हे नाव बदलून नाशिक फाटा स्टेशन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत संबंधित महापालिकेस शासन निर्देश देऊ शकते.

मेट्रोचे अर्धे उत्पन्न प्रवासी भाडे तिकीटातून वसुल होते. उर्वरित उत्पन्न जाहिरात व इतर माध्यमातून जमविले जाणार आहे. स्टेशनच्या पादचारी मार्गावर तसेच, मार्गिकेच्या दोन पिलरमधील जागेत जाहिरात फलक लावले जाणार आहेत. तसेच, स्टेशनला कंपनी किंवा आस्थापनेचे नाव देऊन को ब्रॅण्डींग केले जाणार आहे. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनचे नाव ‘संत तुकाराम नगर- सॅण्डविक आशिया’ असे करण्यात येणार आहे.