पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी

0
425

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजुरी दिली आहे. मंडळाकडून याची शिफारस केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाला केली जाणार आहे. मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रोने सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सुरु केली. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते महिनाभरात पूर्ण होईल. तर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षअखेर पर्यंत या दोन्ही मार्गावर पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरू होईल.

पहिल्या टप्प्यातील मार्गांचा पुढे विस्तार करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या 4.4 किलोमीटर मार्गाच्या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजुरी दिली आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी अशी तीन मेट्रो स्थानके असतील. तर यासाठी 910 कोटी रुपये खर्च येणार आहे.

स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तो प्राथमिक टप्प्यावर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

स्वारगेट ते कात्रज हा 5.4 किलोमीटर भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. या मार्गाचा खर्च 3 हजार 663 कोटी रुपये आहे. हा भुयारी मार्ग असल्याने तो अधिक खर्चिक आहे. त्याच्या मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी आवश्यक असल्याने त्याला विलंब लागणार आहे.