पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा “एईएसए बहिरे राठी” पुरस्काराने गौरव

0
365

पिंपळे सौदागर, पिंपळे निलख येथील रस्ते, स्ट्रीट लँडस्केप, प्लेसमेकिंग प्रकल्पांना मिळाला पुरस्कार

पिंपरी, दि. २२ (पीसीबी): पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने विकसीत केलेल्या स्ट्रीट क्रिएटिंग, क्राफ्टिंग लँडस्केप आणि ८ ते ८० पार्क प्लेसमेकिंग प्रकल्पांना पुणे येथील “आर्किटेक्चर इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन”मार्फत “AESA बेहारे राठी पुरस्कार २०२३” देवून गौरविण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या एबीडी प्रकल्पांतर्गत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात रस्ते विकास, बिल्डिंग डिझाईन आणि उत्कृष्ठ बांधकामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

AESA असोशिएशनच्या वर्धापनदिनानिमीत्त पुणे येथील पीवायसी हिंदू ‍जिमखाना भांडारकर रोड परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक (इन्फ्रा) मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, वास्तुविशारद प्रसन्न देसाई आर्किटेक्ट संस्था (PDA) आणि विकसक बी.जी.शिर्के कंपनीचे अधिकारी –कर्मचारी यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० हजार रुपये चेक असे पुरस्काराचे स्वरुप होते.

हाऊसिंग, बंग्लो, सोसायटी हाऊसिंग, इंडस्ट्रीयल/ नॉन इंडस्ट्रीयल ‍आणि इतर या पाच प्रकारात स्पर्धा घेण्यात आली होती. पुणे व ग्रामीण भागातील वास्तुविशारद आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ञ संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. शासकीय प्रकल्पातून एकमेव पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचा समावेश होता. यामध्ये, बेस्ट डिझाईन आणि प्रेझेंटेशनद्वारे प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली होती.

तसेच, आर्किटेक्ट अभियंता, लँडस्केप आर्किटेक्ट आणि बांधकाम उद्योगातील AESA ज्युरी सदस्यांमार्फत प्रत्यक्ष भेट देवून प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर येथील स्ट्रीट क्रिएटिंग, क्राफ्टिंग लँडस्केप आणि ८ ते ८० पार्क प्लेसमेकिंग प्रकल्पांनी बाजी मारली. “टीमवर्क” आधारित संकल्पनेवर AESA ने असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त AESA पुरस्काराचे आयोजन केले होते.