पिंपरी चिंचवड सायबर सेलची उल्‍हासनगरमध्‍ये कारवाई

0
148

शेअर मार्केटच्‍या नावाखाली फसवणूक कराणार्‍यास अटक

पिंपरी, दि. २२ ऑगस्ट (पीसीबी) देहूरोड,
पिंपरी चिंचवड सायबर सेलने उल्हासनगर मध्ये कारवाई करत सायबर गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली. देहूरोड मधील एका व्यक्तीची ट्रेडिंगच्या बहाण्याने 20 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्यात मुख्य आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

अजयकुमार किशनलाल आर्या (रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून आरोपींनी त्‍यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले. ग्रुपवरील कंपनीला सेबीची मान्यता असल्‍याचे खोटे सांगून आरोपींच्‍या सांगण्याप्रमाणे शेअर ट्रेडींग केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे अमीष दाखविले. शेअर ट्रेडींगच्या नावाने वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर 20 लाख 24 हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या गुन्‍ह्याचा सायबर सेलकडून समांतर तपास सुरू होता. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वेगवेगळया बँक अकाऊंटचा वापर केला असल्याचे तपासात दिसून आले. अकाऊंटधारक आरोपी हा उल्हासनगर येथील असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त झाली. त्‍यानुसार सायबर सेलचे एक पथक तपासाकरिता उल्‍हासनगरला पाठविण्‍यात आले. पोलिसांनी बँक अकाऊंट धारकाचा शोध घेऊ त्‍यांच्‍याकडे विचारपूस केली असता त्‍याने गुन्‍ह्यात वापरलेले अकाऊंट त्‍याच्‍या ओळखीची व्‍यक्‍ती अजयकुमार आर्या याला दिल्‍याचे सांगितले.

पोलिसांनी आर्या याला ताब्‍यात घेतले असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्‍याला खाक्‍या दाखविला असता त्याने त्याचा साथीदार परमान साजीद अली खान व निखिल सेलवानी यांच्‍या सांगण्यावरुन बँक अकाऊंट घेऊन त्याबदल्यात मोबदला घेतला. तसेच स्वतःचे कोटक बँकेतील खात्‍यावरही फ्रॉड रक्कम घेतल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. एटीएममधून पैसे काढून इतर दोन आरोपींना दिल्‍याचेही त्‍याने सांगितले. आरोपी आर्या याला देहूरोड पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, सिमा मुंढे, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार प्रिया वसावे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, दिपक भोसले, नितेश बिचेवार, श्रीकांत कबुले, स्वप्निल खणसे, कृष्णा गवळी, विशाल गायकवाड, बळीराम नवले, अभिजीत उकिरडे यांच्‍या पथकाने केली आहे.