पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

0
73

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 60 लाखांची फसवणूक

चिंचवड, दि. 13 (पीसीबी)

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. त्यानंतर शनिवारी (दि. 12) सायबर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 25 ते 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल 60 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा हा गुन्हा आहे.

याप्रकरणी सांगवी येथील 59 वर्षीय व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृती, रवी अग्रवाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि इतर सात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंटरनेटवर शेअर मार्केट संदर्भात माहिती घेत होते. त्यावेळी त्यांना एम स्टॉक या कंपनीच्या शेअर ट्रेडिंगची जाहिरात दिसली. जाहिरातीमधील लिंक द्वारे आरोपी कृती हिने फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केले. एम स्टॉक कंपनीच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म द्वारे पैसे गुंतवणूक केल्यास 25 ते 30 टक्के प्रॉफिट मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. शेअर ट्रेडिंगसाठी वेगवेगळ्या बँक खात्यावर फिर्यादी यांच्याकडून एकूण 60 लाख 30 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा अथवा भरलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सायबर पोलीस तपास करीत आहेत.