पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे वर्धापन दिनी ध्वजारोहण

0
407

पिंपरी, दि.6 (पीसीबी) : ‘प्रथम राष्ट्र…नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:…’ असे ब्रिद घेवून गेल्या ४३ वर्षांपासून भारतीयांच्या सेवेत अविरत कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पक्षाची ओळख आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पक्ष भारताला बलशाली करण्याचा संकल्प पूर्ण करील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

भारतीय जनता पार्टीच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी महापौर राहुल जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन करतो. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये भाजपाचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर आणखी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.